जय श्रीराम
संघ परिवाराची दोन यशस्वी आंदोलने एक कश्मिर बचाव 370 हटाव आणि दुसरे राम मंदिर आंदोलन.सुदैवाने आणि सद्सद्विवेक जागा असल्याने या दोन्ही आंदोलनात मना पासून सहभागी होतो.कश्मिर बचाव मधला तुरुंगवास भोगून आल्याचा अनुभव राम मंदिर आंदोलनात कामी आला.पोलीस खात्यात बरेच पोलीस हे सुद्धा राम मंदिराला पाठिंबा देणारेच होते.ज्या LIB वर जनतेची खडान खडा माहिती ठेवायची जबाबदारी असते तेच LIB वाले वेळेला आम्हाला माहिती पुरवत होते बचावाची वेळ आली तर काय करायचे काय नाही याचे पण उपाय सांगत होते.
सगळ्यात भीषण कारसेवा झाली ती 1990 ची रामभक्तांच्या रक्ताने मुलायम ने शरयू नदी लाल केली हे वृत्त जसे बाहेर पडले तसा जनतेत क्रोध आणि आक्रोश वाढत गेला.आमची गँग कारसेवेला गेली होती मी मात्र कॉलेज च्या परिक्षेमुळे जाऊ शकल नव्हतो.
संध्याकाळी आम्ही मुल्लायम आणि V P सिंगच्या फोटोला चपलांचे हार घालून चौका चौकात लावले. तासाभराने पोलिसांनी येऊन ते ताब्यात घेतले त्यानंतर दोन LIB पोलीस मित्र माझ्या घरी आले असे काही उद्योग करून अडचणीत येऊ नका म्हणून.इतक्यावरच न थांबता रात्री मित्राच्या रूम वर येऊन आम्हाला वातावरण गरम आहे जरा शांत रहा असा सल्ला देऊन गेले.हे दोन्ही LIB चे अधिकारी खरच वैयक्तिक चांगले मित्रच होते आमचे.चहा सुद्धा कधी आमच्या पैशाने पिले नाही मुख्य म्हणजे राम मंदिराचे समर्थक पण होते.नावे आजही तोंडपाठ आहेत पण मुद्दाम उल्लेख नाही करत त्याचा.
दुसऱ्या दिवशी मी आपला माझ्या परीक्षेसाठी कॉलेजला निघून गेलो पेपर संपवून घरी आलो तसा आईने निरोप दिला पोलीस आले होते तुला शोधायला.
जेवून बाहेर आलो तसे सविस्तर कळले की आज आमच्यातल्या 7 जणांनी मुल्लायम आणि VP चा पुतळा जाळून पळून गेलेत.पोलीस लिस्ट घेऊन आले होते त्यात तुझे सुद्धा नाव आहे.आमची कार्टी वल्लीच होती एखादे काम करायचे तर करायचे मग ते तासाभरात करणारच.
काल जोड्यांचे हार घालून सुद्धा समाधान झाले नव्हते कुणाचे म्हणून हा उद्योग करून सारे पसार झाले.मी मात्र परीक्षेला गेल्यामुळे यात सहभागी नव्हतो.पण पोलीस तर आपल्याला शोधत आहेत म्हणल्यावर मी स्वताच पोलीस स्टेशन ला हजर झालो.म्हणलं साहेब मला का शोधत होते तुम्ही ? साहेब म्हणला बर झाले तू हजर झालास बाकीचे साथीदार कुठे आहेत तुझे ? मी हसून म्हणलो अहो साहेब साथीदार दरोडेखोरांचे असतात विद्यार्थ्याचे नाही.मी सकाळी 8 ते 12 कॉलेज मध्येच आहे हवे तर प्रिन्सिपल कडून माहिती घ्या.तरी मला दोन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले दोन वेळेस चहा पाजून गोडी गुलाबीत तरी जाळपोळ करणारे कुठे सापडतील याची माझ्या कडून माहिती काढायचा प्रयत्न करत होते.शेवटी मीच त्यांना म्हणलो साहेब मला काहीही माहीत नाही आणि खरच मला काहीही कल्पना नव्हती असे काही घडणार आहे.मला आता जाऊन द्या उद्या पण माझा पेपर आहे तसे त्यांनी मला सोडून दिले.4 वाजता एकाने निरोप दिला तुला नांगरगावला बोलावले आहे एकाच्या बंगल्यावर हे सारे जण आले आहेत.
आता मित्रांवर गुन्हे तर दाखल झाले होते त्यामुळे पुढे जामीन वैगरे भानगडी आल्याच,त्या करायला म्हणून बंगल्यावर मित्राना भेटून आल्यावर तयारी सुरू केली.इकडे आम्ही जामीन तयार करतोय ही बातमी पोलिसांना कळली तशी पोलिसांनी परत मला विचारायला सुरवात केली की यांचा पत्ता तुला माहीत आहे तर ते कुठे आहेत ते सांग ? म्हणलं उद्या सकाळी वडगाव कोर्टात हे सगळे हजर होतील तुम्ही नका काळजी करू. प्रयत्नाना यश येत नाही म्हणल्यावर साहेब अजून भडकला LIB वाल्याना शिव्या घालत म्हणला अरे ही गुडघ्या एव्हढी पोर तुम्हाला हँडल नाही करता आली ? LIB वाला साहेब म्हणला अहो साहेब यांच्या उंचीवर जाऊ नका तुमच्या आधीच्या साहेबांची अचानक बदली झाली ना ती हीच सगळी पोर तरी नशीब तीस चाळीस जण अयोध्येला गेलेत.LIB वाला साहेब अनाहूतपणे बोलून गेला खरे पण मोठ्या साहेबांचा चेहराच पडला. माझ्या कडे बघून म्हणला उद्या सकाळी हजर करणार ना नक्की पोरांना कोर्टात ? म्हणल नक्कीच साहेब 7 ही जणांचे जामीन पण तयार आहेत.जाऊ का मी आता ? उद्याच्या पेपरचा पण अभ्यास राहिलाय माझा जय श्रीराम साहेब म्हणत ऐटीत बाहेर पडलो.
निनाद
Comments
Post a Comment