काक स्पर्श
#काकस्पर्श
खुप जोरात पाऊस झाला की मला लहानपणी वाचलेली चिऊताई आणि कावळ्याची गोष्ट आठवते.कावळा आपल्याकडे आश्रय मागेल म्हणून चिऊताईने अनेक कारण सांगत शेवट पर्यंत कावळ्या साठी दार उघडलेच नाही.तात्पर्य काय तर जेव्हा आपल्याकडेचे कोणाला काही द्यायच नसते तेव्हा त्यांच्या कडे देण्यासाठी फक्त कारण असतात.चिऊताईचे नेमके हेच झाले होते.कावळा कसाबसा का होईना पण संकटातून तरुन गेला.आता ऋतू बदलला पावसाळा जाऊन उन्हाळा आला.आता ऋतू बदलला आहेच तर कथा पण बदलुनच टाकू.
पावसाळा संपला घर वाहून गेलेला कावळा गावाच्या स्मशानभूमीतल्या एका कोपऱ्यात राहिला कित्येक दिवस.जसा पावसाळा संपला तसा कावळ्याने पुन्हा जुन्या झाडावर आपला मुक्काम हलवला.तेच मागच्या कथेतीलच शेणाचे घर परत नव्या उमेदीने त्याने बांधायला घेतले.हे सारे त्याची शेजारी तीच चिऊताई कावळ्याची लगबग बघत होतीच.पण मनात कुठे तरी आपल्या वागण्याची खंत मनात असल्याने ती कावळ्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती.कावळ्याने अखेर परत तसेच शेणाचे घर बांधले आणि रहायला सुद्धा आला.रोजच्या रोज उन्हाळा वाढू लागला पण घर शेणाचे असल्याने कावळ्याला उन्हाळ्याचा काहीच त्रास झाला नाही.इकडे चिऊताईचे घर मात्र मेणाचे असल्याने वितळू लागले.जस कावळ्याचे घर वाहून गेले होते नेमके तसेच चिऊताईचे घर वितळून गेले.पिल्ले उघड्यावर पडली उन्हाचे चटके सहन करणे त्या जीवाना शक्य नव्हते.आता मात्र चिमणी कावरीबावरी झाली नवीन घर बांधे पर्यंत पिल्ले काय करणार ? याच विचाराने तिचा जीव कासावीस झाला.
इकडे कावळे दादा पितृ पंधरवड्याची ड्युटी संपवून घरी परत येत होता सकाळ पासून गोडधोड खाऊन डोळे मिटायला लागलेच होते आता घरी जाऊन मस्त झोप काढावी असा विचार करत झाडावर आला.तेव्हढ्यात समोरच्या फांदीवर चिऊताईचे घर वितळलेले आहे चिऊताई आपल्या पिल्लाना चिंतेच्या मुद्रेत बसलेली दिसली.गरीब असेल कावळा पण मूर्ख नक्कीच नव्हता क्षणभर जीव हळहळला त्याचा.काय झाले आहे आणि आपल्याला नक्की काय करायचे आहे याचा आराखडा बांधत एका झेपत चिमणी रहाते त्या फांदीवर गेला.चिऊताईला वाटले आता कावळा आपल्या परिस्थितीला हसेल आपण त्याला मदत केली नाही संकटात हेही बोलून दाखवेल.स्वताचे मन जेव्हा स्वताला खाते न तेव्हा असेच विचार करतात सगळे.
चिऊताई...ए चिऊताई ..कावळ्याने आवाज दिला तशी चिऊताई भानावर आली.तिच्या डोळ्यातले पाणी बघून कावळा तिला म्हणाला अग उन्हाळाच खूप आहे ना म्हणून तुझे घर वितळले आहे खरे पण तू काळजी करू नकोस या कावळेदादाचे घर भक्कम आहे तू एक काम कर तू आणि तुझी पिल्ले माझ्या शेणाच्या घरात उन्हाळा संपे पर्यंत रहा.आधीच चिंताग्रस्त असलेली चिऊताई खजील झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.अग वेडे रडतेस काय आधी पिल्ले घेऊन घरात जा ऊन खूप आहे पिल्लाना त्रास नको व्हायला,कावळा काळजीच्या सुरात म्हणाला.तशी चिऊताई डोळे पुसत म्हणाली अरे मी तर तुला संकटात मदत सोड साधे दार उघडून तुझी चौकशीही केली नव्हती माझ्या कडे आश्रय मागशील या भीतीने.आणि तरी तू हे सगळे विसरून तुझे घर मला रहायला देतोयस ? अग चिऊताई म्हणतो ना मी तुला मग माझे कर्तव्यच आहे तुझ्या पाठीशी उभे रहाणे.आणि दिसायला काळा आहे ग मी पण मनाने नाही,त्यादिवशीही मी तुझ्या कडे आश्रय मागायला आलोच नव्हतो तुला फक्त इतकेच सांगायचे होते की मी स्मशानभूमीत एका वटवाघुळ मित्राच्या शेजारी रहायला जातोय.माझे कोणी आप्त आले तर त्यांना हा निरोप मिळावा इतकाच हेतू होता माझा.त्यामुळे तू मला आश्रय दिला नाहीस असे अजिबात वाटून घेऊ नकोस.आणि खर सांगू ? दोन महिने स्मशानात राहिलो ना सगळे मोहच संपून गेले माझे तर.आता निरोप दे मला आणि हो हे घर तुझेच आहे तुला हवे तितके दिवस रहा नाही तर कायमची राहिलीस तरी माझीह हरकत नाही.आता बस कर बघू रडणे मी मधून अधून तुला आणि भाच्याना भेटायला येईन नक्की, मात्र तेव्हा दार उघडून चहा पाज बर मला असे म्हणत कावळा आकाशात उडाला सुद्धा.भरल्या डोळ्याने चिऊताई आकाशात उडणाऱ्या कावळेदादा कडे पहात राहिली,आता तिला कावळादादा आकाशापेक्षा मोठा भासला.
Comments
Post a Comment