#मूल्यमापन
गावात भिक्षा मागून गोपाळ आपल्या गुरुकुलात परत आला पण आज चेहरा जरा त्रासलेलाच होता.गुरुजींच्या लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही,गोपाळ तसा गुणी मुलगा सधन कुटुंबातला पण गुरुकुलातल्या नियमा नुसार भिक्षा मागायला जाणे गुरुकुलातल्या परंपरेचा भाग म्हणून त्यालाही जावे लागत असे.
हात पाय धुवून गोपाळ आला तसा गुरुजींनी त्याला आवाज दिला गोपाळ इकडे ये जरा.तसा गोपाळ गुरुजींच्या समोर येऊन उभा राहिला.काय रे असा चेहरा त्रासिक का झालाय तुझा ? इतका वेळ मनात साठवलेले दुःख अपमान सारे काही आठवून गोपाळ क्षणभरात म्हणाला गुरुजी उद्या पासून त्या वाड्यातल्या घरी मी भिक्षा मागायला जाणार नाही आज त्या वाड्याची मालकीण मला भिकारी म्हणाली.गुरुजी फक्त हसले त्यांनाही पटले होते गोपाळचे दुखावले जाणे पण त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाले अरे वेड्या ती तुला भिकारी म्हणाली म्हणून तू लगेच थोडी भिकारी होणार आहेस ? तिने तुला तिच्या वकुबा प्रमाणे वागवले तिला भिक्षा आणि याचना यातला फरक कळला नाही हा तिचा दोष आहे.आणि तिच्या दोषा साठी तू तुझे अवमूल्यन का बरे करून घ्यावेसे आणि स्वतालाच त्रास करून घ्यावास ?लीळा चरित्रातील चक्रधर स्वामींचा हत्ती आणि आंधळे याचा दृष्टांत वाचलास ना ? त्यात कुणी आंधळा हत्तीची शेपटी पकडून हत्ती हा सापा सारखा आहे म्हणतो म्हणून हत्तीचा थोडेच साप होणार ?कोवळ्या गोपाळच्या डोक्यात थोडाच प्रकाश पडलाय हे गुरुजींनाही जाणवले.गोपाळ तसा मनाने चांगला, गुरुजींच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवणारा पण मनाने हळवा मनाला लावून घेणारा.
असे कर गुरुजी गोपळाला म्हणले आणि हे म्हणत असताना एक चकचकीत पण ओबडधोबड दगड आपल्या झोळीतून काढून देत म्हणले हे घे आणि दुपारी बाजारात जायचे आणि समोर येईल त्याला हा दगड कितीला घेणार ते विचारायचे आणि खरी किंमत कळे पर्यंत थांबायचे नाही.होय गुरुजी म्हणत गोपाळने तो ओबडधोबड दगड स्वताच्या ताब्यात घेतला.
उन्हे उतरली तसा गोपाळ गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे बाजारात आला,पहिल्यांदाच एक भाजीवाला दिसल्यावर त्याच्या कडे हा दगड कितीला विकत घेणार विचारायला गेला.आधी भाजीवाला या दगडाचा आपल्याला तर काही उपयोग नाही तरी पण त्याला एक पालेभाजीची जुडी देईन म्हणाला.तसा गोपाळ तिथून पुढे निघाला असे करत करत भेटलेला कुणी त्याला पाच रुपये,दहा रुपये देईन म्हणत होते.नाही म्हणायला एक भेटवस्तूच्या दुकानाचा मालक या दगडाला शो पीस म्हणून पन्नास रुपयाला घ्यायला तयार झाला तोच काय तो सगळ्यात जास्ती भाव आता पर्यंत या दगडाला मिळाला होता.चालून चालून थकलेला गोपाळ जरा 5 मिनिटे बसावे मग पुढे जावे असा विचार करून समोर असलेल्या मंदिराच्या पायरीवर बसला.हा दगड विकायचा तर नाही पण फक्त किंमत कळून घ्यायचा गुरुजींचा उद्देश अजून ही गोपाळच्या लक्षात येत नव्हता.तितक्यात देवळातून दर्शन घेऊन एक हिऱ्याचा व्यापारी बाहेर पडत असताना त्याची नजर गोपाळच्या हातातील दगडा कडे जाते आणि त्याची नजर त्या दगडावर खिळून रहाते.इकडे गोपाळच्या पण लक्षात येते की हा कुणी तरी श्रीमंत माणूस आहे आणि हा नक्कीच याची किंमत सांगेल.तसा गोपळ उठून व्यापाऱ्याकडे जाऊन त्याला विचारतो कितीला घेणार हा दगड ? व्यापारी दगड शब्द ऐकून दचकतो म्हणतो एक मिनिट हा दगड मी हातात घेऊन बघू का ? गोपाळ होकारार्थी मान हलवून दगड त्याला बघायला देतो.दोन मिनिटे नीट निरीक्षण करून व्यापारी त्याला म्हणतो कृपया माझ्या दुकानात जाऊन आपण याची किंमत ठरवू या का ? गोपळला या दगडाची खरी किंमत हवी असते त्यामुळे त्यासाठी तो व्यापाऱ्याच्या बरोबर त्याच्या दुकानात जातो.
इतके भव्य आणि उंची रत्ने दागिने विकणाऱ्या या व्यापाऱ्याला काय बरे असे विशेष दिसले असेल गोपाळ मनातल्या मनात म्हणाला.तितक्यात व्यापारी गोपाळाला म्हणाला की तुमची हरकत नसेल तर एक विचारतो हा दगड तुम्हाला कोणी दिलाय ?
गोपळने म्हणतो गुरुजींनी सांगितले होत की याची किंमत काढून आण म्हणून विकायला नाही आलोय मी आपली बाजू मांडत गोपाळ म्हणाला.अरे बाळ तू जरी हा दगड विकायचे म्हणालास ना तरी मी तो विकत घेऊ शकत नाही माझी सगळी संपत्ती विकली तरी इतकी किंमत नाही देऊ शकत कोणीच या हिऱ्याची.
हिऱ्याची ? आश्चर्याने गोपळने व्यापाऱ्याला विचारले.होय हिऱ्याचीच याला अजून पैलू पडले नाहीत म्हणून तो असा ओबडधोबड दिसतोय इतकेच पण गुण तर त्यात सगळे हिऱ्याचेच आहेत त्यात.तुझ्या गुरुजींना सांग माझा निरोप की या हिऱ्याच्या दर्जाला पात्र असलेली किंमत मी नाही देऊ शकत मला माफ करा.आता गोपाळच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला,सकाळच्या भाजीवाल्या पासून ते हिरे व्यापाऱ्याला भेटे पर्यंत दगडाची किंमत बदलत गेली.ज्याने त्याने आपापल्या गरजे प्रमाणे अकले प्रमाणे त्या दगडाचे मूल्य ठरवले होते.त्याची खरी किंमत हिरे व्यापाऱ्यालाच ठाऊक होती.म्हणजे सकाळी वाड्याची मालकीण आपल्याला भिकारी म्हणाली ते त्या भाजीवाल्याने त्या दगडाची अज्ञानाने केलेली किंमत दोन्ही सारखेच होते तर.म्हणजे आपली किंमत ही ती नक्की कोण करते यावर अवलंबून असते तर.सकाळ पासून उदास असलेल्या गोपळाची कळी आता खुलली किती सहजपणे शिकवले गुरुजींनी असा विचार करत हातातला हिरा नीट सांभाळत गोपाळ गुरुकुलाकडे चालू लागला.
Comments
Post a Comment