डोळस प्रेम
मला स्वताला आवडलेली प्रेमकथा म्हणजे चार्ली चॅप्लिनचा "सिटी लाईट" एक ही संवाद नसताना सुद्धा हा मूक चित्रपट काळजाचा ठाव घेऊन जातो.स्टोरी साध्या सरळ आणि लोकांच्या दुःखात त्यांना मदत करणाऱ्या भंगण चार्लीची.
योगायोगानेच फुटपाथवर भेटलेली आंधळी फुलराणी जी नसलेल्या डोळ्यांनी आपल्या फुलांच्या साठी ग्राहक शोधत असे.आधी सहानुभूती मग काळजी असा प्रवास करत चार्ली त्या अंध फुलराणीच्या प्रेमात पडतो.मधल्या काळात चार्लीला दारू पिऊन टून झालेला एक विक्षिप्त जीव द्यायला आलेला दिसतो.त्याला आत्महत्या करण्या पासून रोखण्यात चार्लीला यश येते.तसा तो विक्षिप्त बेवडा याला आपल्या घरी घेऊन जातो.सकाळी दारू उतरल्यावर मात्र याला घरातून हाकलून देतो.चार्ली स्वताला त्या अंध फुलराणीत गुंतवून टाकतो. एकदा बेवड्या मित्रा कडून 10 डॉलर घेऊन तिची सगळी फुले एकाचे वेळी विकत घेतो,तिला मित्राच्या गाडीतून घरी सोडून येतो.काही दिवसांनी ती आजारी आहे कळल्यावर हा तिला भेटायला घरी जातो.तिथे टेबल वर त्याला घरमालकाची उद्या "22"डॉलर भाडे भरले नाही तर घर खाली करायची नोटीस सापडते.आपले प्रेम संकटात सापडले म्हणल्यावर चार्ली कळवळतो पण नुसताच नाही तर या 22 डॉलर साठी बॉक्सिंग च्या रिंग मध्ये उतरून थोबाड ही फोडून घेतो.रात्र होते पण 22 डॉलर काही जमवता येत नाहीत तसा निराश चार्ली रस्त्याने चालला असताना त्याला तोच त्याचा दारू प्यायल्यावर ओळखणारा मित्र भेटतो.एरवी भोळा असणारा चार्ली आपल्या प्रेमा साठी आणि अनुभवाने शहाणा होऊन तो नशेत आहे तो पर्यंत त्याच्या कडून हजार डॉलर घेतो.पण काही माणसे दुर्दवीच त्यांची कोणतीच काम सरळ होत नाहीत त्या प्रमाणे त्या मित्राच्या घरात आधीच दबा धरून बसलेले चोर यांच्यावर हल्ला करतात.चार्ली चोरांना धरायला चोर चोर करत धावतो तसा गस्तीवरचे पोलीस येऊन यालाच पकडतात आणि विचारतात तुझ्या कडे कुठून आले ?चार्ली म्हणतो चला माझ्या मित्राला विचारा.एकवेळ सावली साथ सोडेल पण दुर्दैवाने काही चार्लीची पाठ सोडली नाही इकडे मित्र शुद्धीत आल्या मुळे चार्लीला नेहमी प्रमाणे ओळखत नाही तसे पोलीस चार्लीला घेऊन निघतात.आता हे पैसे प्रेयसीला मिळाले नाही तर ती बेघर होईल या कल्पनेने जिवाच्या आकांताने पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन पळून जातो ते थेट फुलराणीच्या घरी.तिच्या हातात पैसे ठेऊन सांगतो या पैश्यातून डोळ्यांचे पण ऑपरेशन करून घे मी काही दिवसांसाठी बाहेर गावी जातोय म्हणत तिचा निरोप घेतोय.अपेक्षे प्रमाणे दुसऱ्याच दिवशी चार्ली पकडला जातोआणि त्याला सहा महिन्यांची शिक्षा होते.
इकडे फुलराणीचे घर वाचते, डोळ्यांचे ऑपरेशन होऊन दिसू पण लागते.फुलराणीचे जणू भाग्य उजळते. तिच्या फुलांच्या व्यवसायात इतकी प्रगती होते,की ज्या फुटपाथ वर ती फुले विकायची त्याच फुटपाथवर ती एक मोठे दुकान छाटते.आंधळी असताना तिचे डोळे जसे ग्राहक शोधायचे न तसे आता तिला दिसू लागलेले तिचे डोळे प्रत्येक ग्राहकात चार्लीचा न पाहिलेला चेहरा शोधत रहात.नाही म्हणायला अगदी पहिल्या भेटीत चार्लीच्या छातीवर फुल लावताना झालेला स्पर्श इतकीच काय ती खूण तिच्या कडे होती.
सहा महिने उलटतात तशी चार्लीची तुरुंगातुन सुटका होत.इकडे आपल्या राजकुमाराच्या भेटी साठी आसुसलेली फुलराणी आपल्या श्रीमंत (गाडीने घरी सोडणारा रोख हजार डॉलर देणारा तिला श्रीमंतच वाटला) प्रियकराची वाट पहात असते इकडे चार्ली हिला नेहमीच्या जागी शोधत येतो आणि बघतो ती तिचे मोठे दुकान झाले आहे तिला दिसू पण लागले या आनंदात तिच्याकडे एकटक बघत रहातो.फुलराणीला कळत नाही हा असा भिकाऱ्या सारखा माणूस असा का आपल्या कडे बघत उभा आहे.तिच्या बिचारीच्या ध्यानमनी पण नाही की असल्या फाटक्या माणसाने आपली मदत केलीय.आता तिला बिचारीला काय माहिती की ऐपत असून ही मदत करत नाही तो व्यवहार आणि औकात नसून ही मदत करते ते प्रेम.आणि चार्लीच तर खरेच तिच्या वर प्रेम असते,पण ही बिचारी नकळत त्याच्या अवतारावरून त्याला भिकारी समजून काही सुट्टे पैसे आणि एक फुल देऊ लागते.जिच्यावर प्रेम केले तिनेच भिकारी समजावे ? या दुःखात चार्ली स्थब्ध होतो मग फुलराणी त्याच्या हातात पैसे ठेवते आणि फुल त्याच्या कोटाला लावताच क्षणी तिला तो ओळखीचा स्पर्श जाणवतो.मीच एका कवितेत म्हणलो पण आहे शब्दांनी कसे फक्त रोमांच उठतात स्पर्श मात्र हळवे कडकडून भेटतात.ती फक्त त्याला डोळ्याने विचारते तू...? चार्ली पण मान डोलवतो आणि दोघांच्या डोळ्यात अश्रू.संपला जरी चित्रपट तरी बराच वेळ मनात रेंगाळत रहातो.ज्यांना नुसता टाइम पास करायचाय त्यांना विनोदी वाटेल आणि ज्यांना आशय हवाय त्यांच्या साठी तर अप्रतिमच आहे 1931 सालचा चित्रपट आजही पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो.
Comments
Post a Comment