ऋणानुबंध
#ऋणानुबंध
सध्या म्हणजे जानेवारी पासून जरा लवकरच झोपतोय पण असे संकल्प वैगेरे म्हणून नाही सहजच.तसेच 11.30 ला नेट बंद करून झोपणार तेव्हढ्यात जुलियाच्या मुलाचा मेसेज आला hi yaar."जुलिया" माझी रोमानियन मैत्रीण,गेली 20 वर्ष मैत्री होती ती खंडित झाली ते फक्त तिच्या अचानक निधनाने.तिलाही जाऊन आता 3 वर्ष होतील.हा इस्तवान तेव्हा जेमतेम 6 वर्षांचा होता दिसायला आई इतकाच सुंदर.जुलियाला इच्छा होती की भारतीय मुलगी दत्तक घ्यायची पण ते नव्हते योग तिचे.मी तिला म्हणायचो पण यार मला मुलगी असती तर तुझ्या लेकाला नक्कीच जावई करून घेतला असता माझा.आज दोन वर्षा नंतर इस्तवान ला का आठवण आली कुणास ठाऊक म्हणे पर्यत त्याचा दुसरा मेसेज आला आज 2 वर्षांनी रोमानियात आलोय जर्मनीत जॉब करतोय.मगाशी आईच्या ग्रेव ला भेट देऊन आलो तिथे तुझ्या नावाने पण फुले वाहून आलो.क्षणभर कळेच ना मला नक्की काय व्यक्त व्हावे ? मैत्रीण गेल्याचे दुःख तर होते आहेच पण तिच्या लेकाने इतक्या आठवणीने माझ्या वतीने त्याच्या आईला फुले वाहिली याचे समाधान वाटले.गेल्या नंतरही जुलियाचे माझे ऋणाबंध तुटले नाहीत.मला इस्तवानचे खूप कवतुक वाटले जुलिया गेली तेव्हा त्याच्या कडे मी ही इच्छा व्यक्त केली होती की माझ्या वतीने आईच्या समाधीवर 4 फुले वाहाशील का ? आणि जुलियाला सांग निनाद तुला कायमच स्मरणात ठेवेल.त्यावेळेस त्याने माझी इच्छा पूर्ण केली होतीच परत आईच्या समाधीचा फोटो पण पाठवला.हा जुलियाचा पहिलाच फोटो असेल जो कुठल्या अँप वर टाकून डेकोरेट नाही करू शकलो.पण आज याने असे अचानक का केले असेल म्हणून त्यालाच म्हणलो अरे थँक्स यार ! तुला एकदम कसे आठवले हे सगळे ?त्याचे उत्तर ऐकून अजून थक्क झालो तो म्हणला अरे मी लहानपणा पासून तुझी आणि आईची मैत्री बघितली आहे,आणि आईचा इतका जवळचा मित्र मी कधी बघितला नाही.खर तर माझी आई खूप कमी बोलणारी म्हणून ओळखतात इकडे, पण तुझ्याशी हिला मी तासनतास बोलताना बघितले होते.आमच्या घरातले वातावरण तुला माझ्या आधी पासून माहीत होते आईने तशी कल्पना दिली होती मला.मी माझ्या आईला घरात हसताना बघितले ना रे ते तुझ्याशी बोलत असताना.तुझी माझ्या साठी ओळख म्हणजे आईचा बेस्ट फ्रेंड अशीच मला माहिती होते तू पण सेन्सेटिव्ह पर्सन आहेस तुलाही आईची आठवण येत असणार याची खात्री होती मला.मुख्य म्हणजे माझी आई जिथे असेल तिथे तिलाही याचा आनंद झाला असेल.उद्याच परत जर्मनीला जाणार आहे कामात व्यस्त झालो की लक्षात नाही राहिले तर ? म्हणून लगेच मेसेज केला तुला.चल बाय म्हणल बाय गॉड ब्लेस यु म्हणत त्याचा निरोप घेतला.
मन किती वेगाने धावते मागे कित्येक आठवणी आपल्याला हळव्या करून जातात.इस्तवान म्हणला ते खरेच होते जुलियाच्या 4 मुली,हा मुलगा,तिचा नवरा,मोठ्या मुलीचा मुलगा,जुलियाचे वडील हे सगळे जण ओळखीचे होते माझ्या हे कमी की काय म्हणून घरातले श्वान (मैत्रिणीच आहे म्हणून इतका मान देतोय नाय तर कुत्रच म्हणायला पाहिजे)त्यालाही ओळखायचो.
सेम तीही माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाला ओळखायची.मैत्री म्हणजे फक्त चॅटिंग इतक्या पुरतचे नव्हते आमचे नाते अगदी खरा खुरा मित्र असल्या सारखीच प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणार.कोणत्या दिवशी कोणत्या शिफ्टला जाणार हे ही मला सांगायची.कधी कोणती गोष्ट लपवली नाही तिने भले तिची दुःख का असेना.
आपल्याकडे झाले का जेवण ? या इनबॉक्स मधल्या संवादावर किती तरी विनोद केले जातात पण माझा अनुभव उलटा आहे.2008 की 2009 साल असेच काही असेल जुलिया सेकंड शिफ्ट करून रात्री 12 ला घरी यायची बस मध्ये असताना पण बोलणे व्हायचे घरी आली की फ्रेश होऊन पुढे किमान तासभर तरी बोलणे होणार हे ठरलेलेच होते तेही कुणी न ठरवता.एक दिवस घरी आल्यावर नेहमी पेक्ष्या लवकर चॅट वर आली म्हणून तिला विचारले अग जेवलीस का ? अररर दुखरी नस पकडावी कुणी तरी आणि आपण कळवळावे तसेच झाले नेमके जुलियाचे.खर तर या प्रश्नांत रडण्या सारखे काहीच नव्हते पण कॅम वर असल्याने तिच्या डोळ्यातले पाणी स्पष्टपणे दिसले.अरे यार का रडतेस ? काही प्रॉब्लेम आहे का ? का माझे काही चुकले ? हाताने खूण करत मला म्हणाली थांब,आणि दोन मिनिटे तशीच रडत होती मला कळेना राव हिला काय झाले अचानक ? 2 मिनिट अजून गेले तशी डोळे पुसत सावरून म्हणली अरे तू जेवलीस का विचारलेस ना तशीच माझी आई मला विचारायची.तिच्या नंतर आज तू विचारलेस मला.हे घर मी वयाच्या 18 व्या वर्षा पासून नोकरी करून चालवत आले 4 मुली नवरा,मुलगा. 3 मुली जर्मनीत स्थायिक झाल्यात मोठी मुलगी घटस्फोट घेऊन घरी आलीय पण ती तिच्या बापा सारखीच नालायक आहे.हे सगळे जगतात माझयाच पैशावर पण यांना कधीच असे विचारावेसे वाटले नाही वाटत नाही इस्तवान तर अजून खूप लहान आहे पण त्याला आहे माझ्या बद्दल माया.मलाही हे सगळे ऐकून वाईट वाटले पण तिला समजवायचा सुरात म्हणालो अरे तू काही काळजी करू नकोस मी रोज तुला आठवणीने विचारीन जेवलीस का म्हणून.आणि खरच गेली 12 वर्षात एकही दिवस नाही की मी तिला कामावरून आल्यावर जेवलीस का विचारले नाही.फक्त फरक इतकाच पडला होता की आता तिच्या डोळ्यात पाणी नसायचे पण चेहऱ्यावर मात्र हसू यायचे.नकळत का होईना आपल्या या प्रश्नाने कुणाच्या तरी डोळ्यातले अश्रू कमी झाले याचे समाधान व्हायचे.आमच्या इरावतीला आयुष्यातला पहिला व्हिडिओ कॉल करणारी जुलियाचा होती.मैत्रीला अंतराचे बंधन नसते कधी मैत्री खरी खुलते ती आधी संवादातुन त्यातून निर्माण होतो तो विश्वास आणि त्याचे रूपांतर पुढे नात्यात होते.आभासी जग असून मैत्री मात्र आभासी नव्हती 100 टक्के खरी होती आज तिच्या लेकाने हे सिद्ध केले.हिच्या बद्दल 12 वर्षातले अनुभव लिहायचे न तर एक पुस्तक लिहावे लागेल मला.ज्या युरोप मध्ये स्वातंत्र्याचा जयघोष चालू असतो कुठल्याच नात्यांची बंधने कुणी कुणावर लादून घेत नाही अश्या भागातील ही स्त्री विना तक्रार मैत्रीचे बंधन निभावते हेच खरे तर कवतुक करण्या सारखे आहे.मैत्री आपल्या सोयीने सवडीने आणि लहरीवर करणारे बरेच बघितले भेटले पण अगदी दुःखात असली तरी जुलियाने कधीच काही माझ्या पासून लपवले नाही.जे असेल ते मोकळ्या मनाने बोलणार पण आज मूड नाही म्हणून दुर्लक्ष केले बोललीच नाही असे कधीच केले नाही.महिन्यातून दोन दिवस तिच्या वडिलांच्या घरी जायची त्यांना भेटायला तेव्हा फोन बंद असायचा पण तेही 2 दिवस आधी सांगणार की परवा जाणार आहे फोन बंद असेल काळजी करू नकोस.ती पण म्हणायची मला अरे किती विचार करतोस त्रास नाही का होत तुला इतका विचार करून ? मी सांगायचो तिला अरे यार माणसे जेव्हा आपली वाटू लागतात ना तेव्हाच माणूस त्यांचा विचार करतो वेळेला कल्पनेच्याही पलीकडे जाऊन.खरच अशी माणसे भेटणे विरळच आज कालच्या दिवसात.या बाबतीत तरी मी स्वताला भाग्यवंतच म्हणायला हवे.अशी नाती माणसाच्या जाण्याने सुद्धा तुटत नाहीत नाही तर असून माणसे डोळ्या समोर सुद्धा नकोशी होतात.जुलियाच्या लेकाने आमच्या मैत्रीची आठवण ठेवली यात जे समाधान आहे ते अजून कशात असणार ? जुलिया तुझा लेक सुद्धा तुझ्या सारखाच मायाळू आहे.त्याचे वागणे बघून समाधान वाटले पण तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी सुद्धा उभे राहिले.जिथे असशील तिथे सुखी रहा हीच देवाकडे प्रार्थना करतो.
निनाद
Comments
Post a Comment