आमची येरवडा यात्रा(2)


मगाच पर्यंत थ्रिलचा आनंद लुटून झाला आता येरवडा कारागृहातील प्रशासनीक अधिकाऱ्याने सगळ्या नोंदी आणि तपासण्या पूर्ण करून आम्हाला अधिकृत राजकीय कैद्यांचा दर्जा दिला.आत नोंदी करताना पोलीस आईचे नाव काय विचारत(ते का ? याचा उलगडा सुद्धा त्या गडबडीत विचारुन घेतला)मग वडिलांचे,तसे त्या पोलिसाने त्याच्या खाक्यात बापाचे नाव असा प्रश्न केल्या बरोबर पोरे भडकली ओ नीट बोला बापाचं काय म्हणता ?वडील म्हणा नीट. देशभक्ती बरोबर पितृभक्ती जागृत पाहून त्या पोलिसांचे वरिष्ठ त्या पोलिसाला म्हणले अरे ते सगळे चांगल्या घरचे आहेत त्यांना नीट वागणूक द्या तसे पोलीस बापा ऐवजी वडिलांचे नाव काय तुझ्या ? असे साजूक स्वरात विचारू लागले. हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर आमची रवानगी त्यांनी बराकीत केली.
तुरुंगात रवानगी म्हणजे संकटच  पण आमची कथाच वेगळी हे सगळे कट्टर हिंदुत्ववादी ठेवले कोणत्या बराकीत ? तर महात्मा गांधी बराकीत.बिचारे गांधीजी...हे राम
बराकीत सोडायला आलेल्या पोलिसाने आम्हाला बराकीत नेले तेव्हा तिथे किमान ऐंशी नव्वद कच्चे कैदी रहात होते.कोणी पाकिटमार,कुणी भूरटा चोर नाना तऱ्हेचे गुन्हेगार पण सगळे लहान वयातील जेमतेम 18 ते 20 वयाचे असावेत.रात्री 8 ला बराक बंद झाल्यावर कोणी आवाज करत नसत कारण पोलीस दांडक्याने मारायचे त्यांना.
या असल्या वातावरणात झोप येणे तर शक्य नव्हते मग याच मुलांशी गप्पा मारत रात्र संपवली.
पण या सगळ्याना मध्ये 2 जण मात्र कायम वेगळे पडलेले असायचे.मी त्यांच्यातील एकाला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की हे दोघे बलात्काराच्या गुन्हातील आहेत म्हणून आम्ही यांना आमच्यात घेत नाही.कैदी असून त्याने जे सांगितले ते ऐकून धक्काच बसला मला.
त्याने सांगितले की आम्ही कुणी चोऱ्या भांडणे मारामारीच्या गुन्हात आत आलो कुणी पोटासाठी कुणी रागाच्या भरात गुन्हे केले असतील पण बलात्कार सगळ्यात नीच काम त्यांची आमची बरोबरी नाही होत.इथे संडास आणि बाकी असली साफसफाईची कामे याच लोकांकडून करून घेतो आम्ही.कैदी असून असे विचार करणाऱ्या त्या मुलांचे मला कवतुकच वाटले.
    गप्पा मारता मारता सकाळचे 6 कधी वाजले कळलेच नाही.
6 चा भोंगा झाला तसे सगळे कैदी एका रांगेत उभे राहून साने गुरुजींचे "बुद्धी चांगली दे दयाघना"ही प्रार्थना म्हणून परेड साठी बाहेर आले.काल 33 जण आलेले कोण हे पहाण्यासाठी म्हणून जेलर स्वतः आले होते.इतकी सगळी चिल्ली पिल्ली पाहून जेलर साहेब म्हणाले कोण तो ?............(भयानक शिवी)PI यांना इथे पर्यंत आणायची गरजच नव्हती जागेवर सोडायला पाहिजे होते.असो काळजी करू नका तुमचा जामीन झाला की सुटका होईल तुमची.तो पर्यंत तुम्ही माझे पाहुणे.बराकीच्या वॉर्डनला सूचना देऊन साहेब गेले. आता आम्हाला एक अल्युमिनियमची थाळी आणि अल्युमिनियमकचा  एक मग दिला यातच जेवण करायचे. दिलेल्या मगाचे तर मल्टिपरपज उपयोग होते त्यातच चहा प्या, त्यानेच पाणी प्या,त्यातच जेवताना भाजी आणि तोच मग घेऊन प्रातर्विधीला जा.आहे की नाही मल्टिपरपज मग ?या कल्पनेनेच अंगावर शहारा आला त्यावर उपाय म्हणून आम्ही दोघात एक मग वापरायचा आणि दुसरा मग सकाळच्या विधीसाठी ठेवायचा असे ठरवले.
          आता तुरुंग म्हणजे काय याची हळूहळू ओळख होत होती.प्रातर्विधी साठी म्हणून गेलो तर काय बघतो साला दरवाजा अर्धाच ओय हे काय ? सगळे दरवाजे असे कसे ? मी तिथल्या वॉर्डनला विचारले तर तो म्हणाला हे असेच असते कुणी आत जाऊन आत्महत्या करू नये म्हणून.मनात म्हटले हे थोर आहे पण पर्याय नसल्याने अनुभव तर घेऊन आलो.बाकी कैदी कामाला लावून तो वॉर्डन आम्हाला आजूबाजूची माहिती सांगू लागला इतकेच नव्हे तर समोर असलेल्या फाशीगेट चे दर्शन घेऊन आलो जिथे जक्कल सुतार सारखे लोक लटकवले होते.नाव नाय आठवत त्याचे पण खरंच तो प्रेमळच होता किमान आमच्याशी तरी.
मी आणि माझा एक मित्र सचिन दोघांनी त्याला एक गळ घातली की आम्हाला हा कैद्यांचा ड्रेस घालून बघायचाय.तो म्हटला अरे तुम्ही कच्चे कैदी आहात तुम्हाला नाही ड्रेस मिळणार.मी त्याला म्हणलो अहो काका आता इथं पर्यंत आलोच आहे तर ड्रेस पण घालून बघायचाय परत कशाला येणार आम्ही इथे.त्यालाही या वेडेपणाचे हसू आले पण आमची दोघांची इच्छा मात्र त्याने पूर्ण केली.
थोड्या वेळाने एक पोलीस आला म्हणला तुम्हाला भेटायला एक कैदी आलाय चला.
चायला तुरुंगात आपल्याला ओळखणारे कोण बुवा ? प्रश्नांकित चेहरे घेऊन आम्ही 4 जण गेलो बघतो तर लोणावळ्यातील एक खुना्च्या गुन्हातील आरोपी त्याला रात्री 2 वाजताच कळले लोणावळ्यातले 33 जण आले आहेत इथे म्हणून काय झाले बघायला म्हणून तो आला होता. नाव नाही सांगत आता पण भाई मुस्लिम होता पण कट्टर शिवाजी महाराज भक्त तो खून करायच्या आधी दरवर्षी त्याचा घरासमोर शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत मोठ्या हौसेने करत असे.आमचे उद्योग ऐकून गडी खुश झाला बरोबरच्या पोलिसाला यांच्या साठी माझ्या तर्फे चहा पाठव आणि बरोबर 20 सिगारेटची पाकिटेपण आपले भाऊ आहेत  त्यांना त्रास नको व्हायला.हे सगळे आत चालू होते पण बाहेर कोण काय करत आहे आमच्या साठी याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तिथला एक पोलीस म्हणाला शिवजयंती होई पर्यंत सोडतीलसे  वाटत नाही.आता या वातावरणात अजून महिना काढायचा कल्पनेने वातावरण तणावपूर्ण झाले.या सगळ्यात आम्ही पाच सहाजणच तसे मोठे बाकी सगळे ज्युनियर कॉलेजची मुले आता महिना भर नाय सोडले तर यांचे आईबाप काय आपल्याला सोडणार नाहीत.तुरुंगात वेळ म्हणून साला काही जात नाही.आताशी जेमतेम जेवायची वेळ झाली होती चित्रपटात दाखवतात तशी लाईन लावून आपापला भत्ता घ्यायचा.एका लोखंडाच्या पिंपात पाणी तेल कडधान्य मीठ मसाला एकत्र करून दांडक्याने ढवळलेली उसळ(म्हणजे त्याला उसळ म्हणायचे हा कायदाच आहे तिथे)आणि दोन वहीच्या पुठयाच्या सारख्या दिसणाऱ्या दोन पोळ्या त्याही पुठ्या सारख्या कडकच बुडवून खायच्या झाले जेवण.काहीच हालचाल नाही बाहेरच्या जगाशी संपूर्ण संपर्क तुटलेला त्या जेलच्या हद्दीतल्या आकाशातून चिमण्या कावळे पण दिसेनात.दुपारचा चहा झाला,जसे 6 वाजता जेलर आले त्यांनी सांगितले की सुर्यास्ता नंतर सुटका करता येत नाही आणि तुमच्या जामीनाचे कागद पण नाही आले.झालं सुटकेच्या आशा आणि सूर्य एकाच वेळेस मावळले.कुणाचे काय तर कुणाचे काय सगळे निराश झाले आज सुटलो नाही म्हणून पण मला मात्र टेन्शन त्या बुलडॉग टॉयलेटचे.पण नशिबाने साथ दिली 7 वाजता आम्हाला कळवण्यात आले की तुमचा जामीन मंजूर झालाय तुम्हाला सोडण्यात येते आहे.भरत शेठ अगरवाल यांनी (नेहमी प्रमाणे)खटपट करून सर्वोच न्यायालयातील कुण्या न्यायाधीशांची परवानगी घेऊन  आम्हाला सोडवण्यात यश मिळवले होते.सगळे सोपस्कार होऊन एका तासाने बाहेर यायची वेळ आली.मी तर त्या दरवाज्यातून बाहेर पाय टाकताना जाणवलं पारतंत्र्यातून स्वातंत्र्या कडे जाताना कसे वाटत असेल.बाहेर पाऊल टाकले तो समोर किमान 200 जण लोणावळ्यातले ओळखीचे अनोळखी सुद्धा आम्हाला न्यायला हजर होते.आम्हाला उभ्या मावळातून कोण कोण लोक जामीन होते ? का राहिले ?आज तागायत कळले नाही पण एक खरे तुम्ही एखादे चांगले काम केले आणि लोकांनी त्याचे कवतुक केले की घेतल्या कष्टाचे चीज होते.काश्मीर प्रश्नांवर लोकांचे लक्ष वेधणे हे आमचे लक्ष होते.यात आम्ही यशस्वी झालो होतो याची पावती म्हणजे रात्री 1.30 वाजता आमच्या स्वागता साठी जमलेल्या लोकांनी भरून गेलेले रेल्वे स्टेशन.बाहेर आलो तर किमान हजार दीड हजार जण आम्हाला घरा पर्यंत सोडायला आले येताना कळले गेले दीड दिवस लोणावळा कडकडीत बंद होता.
लोणावळेकरांच्या रागाची दखल सरकारला घ्यावी लागली आणि रातोरात संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली.
हे सगळे आठवले त्याचे कारण काश्मीर प्रश्न एका निर्णायक वळणावर आलाय किंबहुना तो सुटावा हीच आशा करतो.

Comments

Popular posts from this blog

अव्यक्त गुलाब

काक स्पर्श

तुम .....